Pink ribbon activity 2
कॅन्सरचे निदान करण्याच्या तपासण्या कोणत्या आहेत ?
कॅन्सरचे निदान होण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे self breast examination .
Self breast exam – स्वत:च्या शरीराकडे सजगतेने बघणाऱ्या स्त्रीला आपल्या शरीरातले स्तनाच्या ठिकाणचे बदल जितक्या लवकर लक्षात येतात, तितक्या लवकर निदान होण्यास मदत होते. सोबत जोडलेल्या व्हिडियोच्या आधारे स्वत: स्वत:च्या ब्रेस्टची तपासणी कशी करायची याचे शिक्षण दिले आहे.
F.N.A.C – Fine Needle Aspiration Cytology यामध्ये ज्या ठिकाणी गाठ आहे, त्यात एक नीडल (सुई) घालून त्यातील पेशी काढल्या जातात. त्या पेशींची तपासणी केली जाते. यामध्ये जर कॅन्सरच्या पेशी सापडल्या तर इतर निदान पद्धतींनी खात्री करून आजाराची कक्षा ठरवली जाते. म्हणजे कॅन्सर फक्त ब्रेस्ट पुरता मर्यादित आहे की अन्यत्र पसरला आहे, याची इतर पद्धतींनी तपासणी करून त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. FNAC ही ब्रेस्ट कॅन्सरची एक महत्वाची आणि कमी खर्चात सहज उपलब्ध होणारी अशी तपासणी आहे.
Biopsy – यामध्ये ती गाठ काढून / गाठीचा तुकडा काढून त्याची प्रयोग शाळेत तपासणी केली जाते. कन्सर नक्की कोणत्या प्रकारचा आहे हे शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. परंतु Biopsy करण्यासाठी शल्य चिकित्सकाकडून ती गाठ काढून घेणे आवश्यक आहे.
Mammography - ही स्तनांची एक विशिष्ट प्रकारची एक्सरे तपासणी आहे ज्यामध्ये स्तनांच्या ठिकाणी खालून व वरून विशिष्ट प्रकारचा दाब देऊन क्ष किरणांद्वारे स्तनाची तपासणी केली जाते. स्तनाच्या कोणत्या भागात किती आकाराची गाठ आहे याचा अंदाज घेण्यासाठी या तपासणीचा उपयोग होतो.
ब्रेस्ट अल्ट्रासाऊंड – सोनोग्राफी तंत्रज्ञानाच्या साह्याने स्तनाची सोनोग्राफी केली जाते. यामध्ये सुद्धा किती खोलवर आणि किती आकाराच्या गाठी आहेत हे निदान केले जाते.
MRI ब्रेस्ट – शक्यतो ज्यांच्यामध्ये कॅन्सरचे निदान झाले आहे, त्यांच्यामध्ये आजार कितपत पसरला आहे हे बघण्यासाठी ही तपासणी केली जाते.
IHC ( Immuno Histochemistry ) - या तपासणी द्वारे आगोदर निदान करून खात्री झालेल्या ब्रेस्ट कॅन्सर साठी कोणती chemotherapy योग्य आहे, त्या drugs चे selection करता येते.
"लवकर निदान.... लवकर उपचार
यासाठीच करूया pink ribbon चा प्रचार...."
डॉ गौरी