आभाळ दाटलंय गच्च
आभाळ दाटलंय गच्च पण पाऊस पडत नाही
दाटून आलेलं मन कधीच कुणाला सोसवत नाही
भरुन आलेले मेघ एकदा रिते व्हायला हवे
गच्च एका मिठीतुन बरसुन जायला हवे
परतीचा पाऊस लागला की काहीच सुचत नाही
तू जातानाचा क्षण कधीच मनाला रुचत नाही
सतत पाऊस पडायला हवा म्हणणंच नाही माझं
वळिवाची एक सरसुद्धा मोहक रुप तुझं
काळ्याकुट्ट ढगांच्या आड एक कवडसा हवा
श्रावण सरींचा लपंडाव आपल्याही नात्यात हवा
- गौरी