काविळीतला आहार
काविळीतला आहार
लिव्हर हा शरीरातला एक महत्वाचा अवयव आहे. याचे
कार्य बघता याला ”शरीराची
केमिकल”
फॅक्टरी म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
जनसामान्यात माहीत असलेला लिव्हरचा एक महत्वपूर्ण आजार म्हणजे काविळ. शरीरात
लिव्हरला काही कारणाने आजार झाला, पित्ताचे चयापचय बिघडले कोणत्याही कारणाने
रक्तामध्ये पित्त रंजक द्रव्यांची अधिकता झाल्यास की काविळीचा आजार होतो. यालाच
कामला असेही म्हणतात. काविळीमध्ये शरीरातील बिलीरुबीनचे प्रमाण वाढते व
त्यामुळे त्वचेला डोळ्याला,नखांना
पिवळेपणा येतो. इतकेच नव्हे तर लघवीला देखील हळदी सारखा पिवळा रंग येतो. काविळ हा
एकांगी आजारापेक्षा लक्षण स्वरूप अधिक प्रमाणात बघायला मिळतो. दुषित पाणी, विषारी
अन्नघटक,
उघड्यावरचे खाद्यपदार्थ, काही
विषाणूजन्य infections,
अत्यधिक प्रमाणात दारूचे सेवन यामुळे
लिव्हरला त्रास आणि त्यामुळे काविळ होण्याचा धोका असतो. बरेचदा काविळ काही विशेष
औषधे न करता पथ्यपाणी सांभाळून बरी होते, पण
काही प्रकारच्या काविळीमध्ये औषधोपचार, ऑपरेशन
देखील करावे लागते. कोणत्या कारणामुळे काविळ झाली आहे हे पाहून त्यानुसार आहार
ठरवणे सर्वात महत्वाचे ठरते.
काविळ झाली असताना भूक मंदावली असते, अशा
वेळी हलका,पचायला
सोपा असा आहार घ्यावा. तांदूळ भाजून सुंठ घालून केलेला मऊ जिरे भात, मेतकुट
भात,
भाजलेल्या डाळ तांदळाची खिचडी, रव्याची
खीर यासारखे पदार्थ खावे. शरीरात वाढलेले बिलीरुबीन लघवी वाटे बाहेर पडण्यास मदत
होते. त्यामुळे दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी / द्रव पदार्थ सेवन करावेत.
परंतु याचा अर्थ किडनी वर अधिक ताण पडेल इतकेही पाणी पिऊ नये. पाणी पिताना एक
ग्लास पाणी कोमट करून त्यात लिंबाचा रस चार ते पाच थेंब इतक्या प्रमाणात मिसळल्यास
पचनक्रिया सुधारायला मदत होते. लिंबाच्या रसातून / आंबट गोड फळांतून मिळणारे
व्हिटामिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आहे. सॉफ्ट
ड्रिंक्स,
सर्व प्रकारचे कोला यातील high sugar मुळे
लिव्हरवर अतिरिक्त ताण पडतो. अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेलेल्या साखरेचे शरीर
चरबीत रुपांतर करते,
अतिरिक्त चरबीमुळे स्थूलता वाढते व ही वाढलेली
स्थूलता अनेक आजारांना निमंत्रण देते यासाठी अत्यधिक गोड पदार्थ टाळावेत. भूक कमी
असताना,
शरीरात अशक्तपणा जाणवत असताना ऊसाचा रस मात्र
पचायला सोपा,
तात्काळ एनर्जी देणारा, इलेक्ट्रॉलाईट्स
पुरवणारा,
आतड्यांना बळकटी देणारा, antioxidant गुणधर्म
असणारा असल्याने ऊसाचा रस काविळीत आवर्जून दिला जातो. नारळाचे पाणी सुद्धा उत्तम
प्रकारे काम करते.
हिरव्या रंगाच्या द्राक्षांचा रस, आलं.
लसूण,
आवळा, तुळशी, पपईच्या
पानांचा रस,
शेळीचे दुध, डाळींब हे
पदार्थ पथ्यकर म्हणून वापरायला हरकत नाही. भूक आणि पचन थोडे सुधारल्यावर स्वच्छ व
ताज्या भाज्या,
फळे द्यायला सुरुवात करावी. फळांमध्ये पपई, अननस
व आंबा यांच्यातील digestive
enzymes मुळे उपयुक्त ठरतात.
काविळ होऊ नये यासाठी उघड्यावरचे खाद्यपदार्थ
टाळावेत. आहार संतुलित व आरोग्यदायी असावा.
पचन व पोषण योग्य होण्यासाठी जास्त फायबर असणारे
धान्य नाचणी,
वरी, हातसडीचा
तांदूळ,
न चाळलेले धान्यपीठ यांचा वापर करावा. साजूक तुप, वनस्पती
तेलांचा वापर अल्प प्रमाणातच करावा. त्यातल्या त्यात राईस ब्रान ऑईल, ऑलीव्ह
ऑईल या सारखी तेलं काविळीत वापरावीत. अमूल बटर / वारणा बटर, डालडा, बेकरी
पदार्थ वर्ज्य,
खारावलेले पदार्थ, हवाबंद
वेफर्स खाणे टाळावे. मांसाहाराची आवड असल्यास Omega-3 fatty acids साठी
आठवड्यातून दोन वेळा मासे,
जास्त चरबी असलेला भाग टाळून क्लास I प्रोटीन
साठी आवश्यक तेवढाच मांसाहार, साय काढलेले दुध, त्या
पासून बनवलेले दही यांचे सेवन करावे. हॉटेलात खाणे टाळावे पण खाण्याची वेळ आल्यास
तळलेल्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ उदा. पुरीच्या ऐवजी फुलके, बिर्याणीपेक्षा
स्टीम राईस अशा प्रकारचे मेन्यू आपल्या डिश मध्ये असावेत.
डॉ गौरी गणपत्ये
gurugouri@gmail.com
गणेश लेखमालेतला आज शेवटचा लेख
12.09.2019
लोकमत, हॅलो
सिंधुदुर्ग
लेख 10