तापातला आहार
तापातला आहार
तापाचे ढोबळमानाने खालील प्रकार पडतात.
थोड्या अवधीचा ताप- थंडी, फ्ल्यू, इंफ्लूएंझा§
दीर्घ मुदतीचा ताप- टी. बी.§
अधूनमधून येणारा ताप- मलेरिया§
याशिवाय लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, स्वाईनफ्लू यांची सुरुवातीची लक्षणे एकसारखीच असतात.
तील समान लक्षण प्रामुख्याने ताप हेच असते.§
तापाचे शरीरावर होणारे परिणाम
एक डिग्री फॅरेनहाईटने शरीराचे तापमान वाढल्यास चयापचयाची क्रिया (metabolic rate) ७ टक्केने वाढते. त्यामुळे तापानंतर शरीराला अधिक उष्मांकाची गरज असते.§
शरीरातील कार्बोहायड्रेट (Glycogen) चा व चरबीचा (Adipose tissue) साठा कमी व्हायला लगतो.§
प्रोटिन्सचा अपचय अधिक झाल्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो.§
तापानंतरच्या घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शरीराला एक प्रकारची रुक्षता येते.§
सोडियम व पोटॅशियम या Minerals चे उत्सर्जन वाढते.§
आयुर्वेदात तापाच्या अवस्थेत लंघन सांगितले आहे. पचनशक्ती कमकुवत झाली असते. त्यामुळे तापाच्या वेगावस्थेत हलका आहार घेऊन पुढच्या १५ दिवसात ही झीज भरून काढायची. आधुनिक आहार शास्त्रानुसार तापात आहार कसा व किती घ्यायचा यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा लागतो.
कॅलरी उष्मांक-
तापाच्या प्रकारानुसार व तीव्रतेनुसार कॅलरीची गरज २० टक्के पासून ५० टक्के पर्यंत वाढू शकते. तापाच्या वेगावस्थेत पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा आहार ६०० ते १२०० कॅलरी प्रतिदिन असावा पण तो शक्य तितका लवकर वाढवता यावा.
प्रोटीन्स-
ताप अधिक मुदतीचा असेल तर प्रोटीनची गरज जवळजवळ प्रति किलो १.५ ते १.८ पर्यंत किंवा अधिकपर्यंत जाऊ शकते. पण वेगावस्थेत प्रोटीन्स पचवण्याची ताकद नसते. म्हणून वेगावस्थेत सहज पचणारे पदार्थ द्यावेत, पण तापातून उठल्यावर दुधातून प्रोटीन पावडर चालू शकते.
कार्बोहायड्रेट-
ग्लायकोजेनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्लुकोजचा वापर वाढवला पाहिजे. ग्लुकोज हे साखरेपेक्षा कमी गोड असते व रक्तात पटकन शोषले जाते.
फॅट-
फॅट्सने सर्वात जास्त म्हणजे १ ग्रॅम फॅट्समध्ये ९ कॅलरी वाढतात. म्हणून फॅट्सचा योग्य वापर केल्यास झीज लवकर भरून निघेल पण तेलकट पदार्थ व तेलकट मिठाई टाळावी.
गरम गरम भातावर चमचाभर साजूक तूप घेतल्यास उत्तम. सोडियमची झीज भरून काढण्यासाठी काही दिवस भातावर किंचित मीठ भुरभुरून घ्यावे. पालक सुपचा वापर करावा. फळांचे रस यामध्ये नैसर्गिकपणे सोडियम मिळते.
व्हिटामिन्स-
बी कॉम्प्लेक्स सी, ए यांची गरज असते. तापात वापरलेल्या अॅंटीबायोटीक्समुळे आतड्यामधील आवश्यक त्या जंतूंची पैदास कमी होते ती बी कॉम्प्लेक्समुळे वाढते.
घामातून व लघवीद्वारे शरीरात तयार झालेली विषद्रव्ये बाहेर पडतात. ती त्वरेने निघून जाण्यासाठी २००० ते ३००० मिली द्रव पदार्थ पोटात गेल्यास उत्तम, सौम्य तिखट उपमा, शिरा, रव्याची खीर, मुगडाळ तांदूळ भाजून केलेली खिचडी, वाफवलेल्या इडल्या, मऊ जिरे भात या सर्वांचा तापाच्या वेगावस्थेत उपयोग केला जातो.
तापाच्या वेगावस्थेत साधारणतः मोठ्या माणसाचा लंघनयुक्त आहार खालीलप्रमाणे असावा.
सकाळी ७ वा. – आलं घालून केलेला चहा १ कप, अर्धा कप दुध, २ चमचे साखर§
नाश्ता ९ वा. – रव्याची खीर १ ते दीड वाटी§
११ वाजता – पेज साधारणतः २०० मिली§
दुपारी १ वाजता – मुगडाळ तांदूळ खिचडी किंवा गरम जिरे भात§
संध्या ४ वा. – एक मोसंबी§
संध्या ६ वा. – वनौषधी युक्त चहा १ कप§
रात्री ८ वा. – गरम भात व वरण लिंबाचे काही थेंब पिळून§
रात्री १० वा. – हळद टाकून गरम दुध १ कप २ चमचे साखर§
विशिष्ट तापाच्या अवस्थेत घ्यावयाच्या आजारासाठी व्यक्तीची प्रकृती, आजाराची अवस्था व शरीरावर झालेले परिणाम यांचा विचार करून आहारतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.
डॉ गौरी गणपत्ये
gurugouri@gmail.com
6.09.2019
लेख ४
