मधुमेह व आहार
मधुमेह व आहार
भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.
भारतातल्या प्रत्येक आठ मागे एका व्यक्तीला मधुमेह आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या
आकडेवारीनुसार 2025 सालापर्यंत भारतात 57.2 मिलियन मधुमेहाचे रुग्ण
असतील. बैठे काम, व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्याच्या
बदललेल्या सवयी यासोबतच वाढता ताणतणाव, आनुवंशिकता व इतरही काही गोष्टी मधुमेहासाठी कारणीभूत आहेत.
पूर्वीच्या संशोधनानुसार, मधुमेह हा साधारणत: वयाच्या चाळीशीत होण्याचा आजार असला तरी प्रत्यक्षात हा
वयाच्या कोणत्याही वर्षांत होऊ शकतो. मधुमेहात नुसते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत
नाही तर प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट यांच्या
चयापचयाची क्रिया सुद्धा बिघडते. यासाठी मधुमेही व्यक्तींनी आहारासंदर्भात काही
पथ्ये पाळणे हितावह ठरते. मधुमेह आजार जितका जुना, तितके शरीरातील इतर अवयव उदा. किडनी, डोळे, हृदय यांवर परिणाम होण्याची शक्यता
अधिक असते.
मधुमेही व्यक्तींनी साखर, गुळ, मध यांचा आहारात अत्यल्प वापर करावा, Artificial
sweetners चा वापर टाळणे अधिक चांगले.
धान्यांमध्ये तांदळाचा अति वापर टाळावा. पेज, भात यांचा अति वापर टाळून गहू, ज्वारी, नाचणी, वरी यांचा आलटून पालटून एकेकटा किंवा मिश्र धान्ये करून वापर
करावा. फळाचा ज्यूस पिणे टाळावे, त्या ऐवजी
दिवसातून एखादे फळ चाऊन खावे. वेलीवरच्या भाज्या, पालेभाज्या, रानभाज्या यांचा आहारात समावेश
असावा. रोजच्या आहारात सॅलेड, कोशिंबीर यांचा
वापर करावा. प्रोटिन्सची दैनंदिन गरज भागवण्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी डाळी, कडधान्ये यांचे मुबलक प्रमाणात सेवन करावे. मांसाहारी व्यक्तींनी
अंडी ( पांढरा भाग), मासे, मटण ( ग्रेव्ही कमी ) यांचे 40 ते 50 ग्रॅम प्रमाणात आहारात समावेश
करावा. मधुमेही व्यक्तींनी दुधापेक्षा दही, दह्यापेक्षा पातळ ताकाचा आहारात समावेश करावा. मधुमेहासोबत स्थूलता
व हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास वजन प्रमाणात व नियंत्रित राखण्याकडे लक्ष
द्यावे. हॉटेलमध्ये जेवण, रात्रीच्या पार्ट्या अशा ठिकाणी
जेवणे टाळावे. फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स यांचा आहारात समावेश करू नये. बेकरी प्रोडक्ट, अमूल बटर, डालडा, मीठ, मैदा, साखर आणि तांदूळ यांचा वापर करून तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर रहावे. तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा भाजलेले
पदार्थ खाण्याकडे कल असावा. रोजच्या जेवणातून शरीरात जाणाऱ्या तेल, तुपावर नियंत्रण ठेवावे. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. जेवताना
उभ्याने जेवणे, टीव्ही बघत जेवणे, गप्पा मारणे टाळावे.
सकाळचा नाश्ता 8 ते 8.30 च्या दरम्यान, दुपारचे जेवण 1 च्या दरम्यान व
रात्रीचे जेवण 7.30 ते 8 च्या दरम्यान घ्यावे. गोळ्या खाणाऱ्या व्यक्ती व इन्सुलीन घेणाऱ्या
व्यक्ती यामध्ये आहार व आहाराच्या वेळा यात फरक असू शकतो. प्रत्येक मधुमेही
व्यक्तींनी आपल्या आदर्श वजन व उंचीनुसार आपला बीएमआय 22 पर्यंत मर्यादित ठेवावा. बैठे काम करणाऱ्या मधुमेही व्यक्तींनी आपल्या
दिवसभराच्या कॅलरीज आपले आदर्श वजन x 25 इतक्या प्रमाणात सेवन कराव्यात. मधुमेही व्यक्तींनी एकूण कॅलरीचा
साठ ते पासष्ट टक्के कार्बोहायड्रेटचे सेवन करावे .यामध्ये कॉम्प्लेक्स
कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असावे. एकूण कॅलरीच्या साधारणतः वीस टक्के प्रोटीनचे प्रमाण असावे. एकूण कॅलरीच्या पंधरा ते वीस
टक्के फॅटचे प्रमाण असावे.
मधुमेही व्यक्तीने आहार तज्ञांच्या
मार्गदर्शनाखाली आहारातील छोटे मोठे बदल करावेत व त्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन
करावे.
डॉ. सौ गौरी गणपत्ये
स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ
gurugouri@gmail.com
माणगाव , ता कुडाळ, जि सिंधुदुर्ग
5.09.2019